अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, यामुळे शासनाने कठोर नियमांची अंलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशाच एका प्रकारामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अडचणीत सापडले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी अलका टॉकीज चौकात विनापरवानगी आंदोलन केले होते.
त्यामुळे प्रदेशाध्यक्षासह कार्यकर्त्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग व गृहमंत्री यांच्यातील आरोपाच्या प्रकरणावरून राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे.
याचं प्रकरणावरून भाजपकडून सध्या महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी अलका चौकात पुणे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
कोरोना काळात एका ठिकाणी गर्दी होता कामा नये, असा शासन आदेश असतानाही या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्रामबाग पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये चंद्रकात पाटील यांच्यासहीत ४० ते ५० जणांच्या नावांचा समावेश आहे.