अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
दर्शनासाठी सशुल्क पासची सोय करण्यात आली आहे. दरम्यान येणार्या व्हीआयपी ऑनलाईन पासेस व देणगी पावतीवर साईंचा फोटो अनेक वर्षांपासून छापण्यात येत असून दर्शनानंतर भाविक सदरील पास रस्त्यावर तसेच इतरत्र ठिकाणी टाकून निघून जातात.
यामुळे साईबाबांचे दररोज हजारो पासेस व पावत्या पायदळी तर कधी कचर्यात जमा होत असल्याने देवदेवतांचा अपमान होत आहे. भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहचत आहे. यापुढे साईबाबा संस्थानने साईबाबांचे फोटो सदरील पासेस व देणगी पावतीवर छपाई करू नये, अशी मागणी शिर्डी येथील साईनिर्माण उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी केली.
साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांचे फोटो दर्शन पासेस तसेच देणगी पावतीवर वरील एका बाजूला छपाई करून लावण्यात आला आहे. शिर्डी शहरात दिवसात कमीत कमी ऑनलाईन दर्शन, व्हीआयपी पासधारक, देणगी देणारे भाविकांची संख्या हजारांहून जास्त आहे.
सदरील भाविक दर्शनानंतर आपल्याकडील देणगी पावत्या, तसेच दर्शपासेसची रिसीट रस्त्यावर तसेच हॉटेलच्या रुममध्ये टाकून निघून जातात. पर्यायाने या सर्व पावत्या कचर्यात जमा होत असल्याने पवित्र साईबाबांच्या फोटोचा अवमान होत आहे. त्यामुळे संबंधित फोटो साईबाबा संस्थानने छपाई करू नये, अशी मागणी साईभक्त विजय कोतेयांनी केली आहे.