… तर चालू हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोनाचे संकट दूर होत असतानाच शेतकरी राजाला वेध लागलेत ते खरीप हंगामाचे. अकोले तालुक्यातील आदिवासी पट्टयामध्ये सर्वदूर खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भात,नागली,वरई आदी बियाणे पेरून रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात केली आहे.

शेतकरी वरुण राजाची आतुरतेने वाट पाहत आहे. रोपे तयार होण्यासाठी आणि त्यांची पुनलागवड करण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. चालू हंगामामध्ये वेळेवर पाऊस सुरू झाल्याने खरीप हंगामाची सुरुवात चांगली झाली आहे.निसर्गाने कृपा केल्यास चालू हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकते. सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.

आदिवासी पट्ट्यातील बहुसंख्य जमिनी या डोंगर उताराच्या असल्याने या जमिनींवर खरीप हंगामात नागली, वरई,तूर,मूग,उडीद,भुईमूग यासारखे विविध पिके इथला शेतकरी घेत असतो. कसण्यायोग्य जमिनी अत्यंत कमी असल्याने जमिनीचा प्रत्येक भाग अगदी शेतीच्या बांधा पासून उपयोगात आणला जातो.

प्रत्येक जागेवर काही ना काही पेरणी करून शेतकरी पीक पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. शेताच्या बांधावर खुरासणी, तूर, मूग, उडीद यासारखे पिके पेरून देत जागेचा पुरेपूर वापर करून घेत असतो.

यंदाच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर पारंपारिक बियाण्यांचा वापर करून शेती फुलवण्यावर शेतकऱ्यांचा जोर आहे. भात हे इथले मुख्य पीक असून भाताचे जिरवेल, अंबेमोहर, काळभात, तामकुडई, मनोहर, खडक्या, जोग्या या वाणांची मागणी मोठया प्रमाणावर आहे.

त्याच प्रमाणे वरई आणि नागली यांचेही स्थानिक वाण मोठया प्रमाणावर पेरणी होत आहेत. या वाणाचे मोठया प्रमाणावर बियाणे तयार झाले आहे.आदिवासी भागातील सुमारे ३०ते ३५ गावांमध्ये या बियाण्यांचा प्रसार करण्यात आला आहे.

या वाणांचे उत्तम प्रकारे उत्पादन येत असून शेतकऱ्यांमध्ये या वाणांची मागणी वाढत आहे. सर्वत्र भात,नागली,वरईची रोपे तयार होत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

अहमदनगर लाईव्ह 24