अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्रात आज राज्यात 3626 नवीन रूग्णांचे निदान झालं आहे तर 5 हजार 988 कोरोना रूग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे.
त्यामुळे राज्यातले एकूण 63 लाख 755 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतकं झालं आहे.
राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे.
अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे.
दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी, तर कधी जास्त आढळून येत आहे.
सर्वाधिक सक्रिय रूग्ण असलेला जिल्हा सध्या पुणे आहे. त्यानंतर ठाणे, सातारा आणि अहमदनगर आणि मुंबईत केसेस आहेत. ही बाब काळजीत भर टाकणारी आहे.
‘कोरोनाच्या संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून, दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की,
त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत, इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता.
आपल्याला तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या’, असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.