मनपा दक्षता समितीने वसूल केला इतका दंड !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- कोरोना महामारीच्या काळात महापालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर मनपा दक्षता समितीने ६ लाख ६३ हजार ७०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. १६ मार्च ते ६ जून दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.

अहमदनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी आयुक्त शंकर गोरे यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती निहाय कोरोना दक्षता पथक स्थापन करून शशिकांत नजान, परिमल निकम, संतोष लांडगे, कल्याण बल्लाळ यांच्यावर दक्षता पथक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.

१६ मार्चला स्थापन झालेल्या कोरोना दक्षता पथकच्या ४ पथकांनी कोरोना नियम मोडणाऱ्या ५४५ आस्थापना आणि नागरिक यांच्यावर जवळपास साडे सहा लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, शहरातील नागरिक या आजारापासून सुरक्षित राहावेत त्यासाठी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी या हेतूने स्थापन झालेल्या पथकांनी नागरिक आणि महापालिका यांच्यात आयुक्त,

उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयाचे देखील काम केले अशी माहिती दक्षता पथक क्रमांक २ चे प्रमुख शशिकांत नजान यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24