अहमदनगर Live24 टीम, 10 जुलै 2021 :- माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर केंद्रात खासदार प्रितम मुंडे यांना मंत्रीपद न दिल्याने तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत.
पाथर्डीच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधे नाराजीचे वातावरण आहे. मंत्रीपद मुंडे यांच्यासाठी महत्वाचे नव्हते तर जनतेसाठी महत्वाचे होते. पक्षासाठी मुंडे घराण्याचा त्याग केंद्रातील व राज्यातील भाजपाचे नेतृत्व कसे विसरले हेच समजत नाही.
भारतीय जनता पक्षाचा तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे देणार असल्याचे खेडकर म्हणाले.
मंत्रीपदाने प्रितम मुंडे यांना अखेरच्या क्षणी हुलकावणी दिली. विधान परीषदेवरही पंकजा मुंडे यांना घेण्याचे ठरले आणि ऐनवेळी वंजारी समाजातील दुसऱ्याच व्यक्तीला आमदार केले गेले. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना आमचा विरोध नाही.
मात्र प्रितम मुंडे यांनाही मंत्रीपदाची संधी मिळायला हवी होती. पंकजा मुंडे यांना एकाकी पाडण्याचा हा डाव पक्षाचे नेतृत्व खेळत आहे का असा प्रश्न पडला आहे.
भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी स्वर्गीय गोपिनाथ मुंडे व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे योगदान पक्षाचे राज्यातील नेतृत्व कसे विसरले. आम्ही भारतीय जनता पक्षाचे पाथर्डीचे सर्वच पदाधिकारी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे राजीनामे देणार असल्याचे ते म्हणाले.