अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार उपकेंद्रातंर्गत येणार्या किन्ही , बहिरोबावाडी , तिखोल या गावांमधील कृषीपंपांचे थकीत विजबील वसुलीसाठी महावितरणने विजपुरवठा खंडित केला होता.
यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी सुमारे तीन तास कान्हुर पठार येथिल महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील किन्ही , बहिरोबावाडी , तिखोल या गावांमध्ये दिवसांपासून शेतीसाठी सुरळीत व पुर्ण क्षमतेने विजपुरवठा होत नसल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे असा संतप्त सवाल
या वेळी शेतकरी नेते अनिल देठे पाटील व आंदोलक शेतकर्यांनी केला. तिन्ही गावांना कृषीपंपांना सुरळीत व पुर्ण क्षमतेने विजपुरवठा मिळाल्यास
शेतकरी वीजबिल भरतील परंतु महावितरण कंपनीने देखील वारंवार खंडित होणार्या विजेच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा.
अन्यथा शेतकर्यांसह पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच यापुढे सुरळीत व अखंडितपणे विजपुरवठा न मिळाल्यास एकही शेतकरी वीजबिल भरणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.