file photo

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- फिटनेस प्रमाणपत्र व इन्शुरन्स थकीत असलेल्या रिक्षांवर कारवाई करू नये, अशी मागणी रिक्षा चालक संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांच्याकडे करण्यात आली होती.

या मागणीला यश आले असून ज्या रिक्षाचालकांचे लॉकडाऊन काळात फिटनेस इन्शुरन्स थकलेले आहेत, त्यांना दंड आकारला जाणार नाही, असे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिले आहे.

दरम्यान करोनामुळे रिक्षाचालकांचे दीड वर्षापासून व्यवसाय ठप्प झाले होते. शहराचे कार्यक्षेत्र कमी असल्यामुळे तसेच नगरमध्ये मोठे उद्योग नसल्यामुळे लोकसंख्येच्या आधारावर परवाने न देता जास्तीचे परवाने देण्यात आलेले आहेत.

त्यामुळे रिक्षाचालकांचे व्यवसाय होत नाहीत. रिक्षाचालकांना आपले कुटुंब चालवणे मुश्कील झाले आहे. परिस्थितीचा विचार करता रिक्षाचालकांना रिक्षा क्लिअर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.

त्याबाबत पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याबाबत बोलताना परिवहन अधिकारी पवार म्हणाल्या कि, फिटनेस इन्शुरन्स मुदतवाढ देण्यात येणार आहे.

मात्र ज्यांनी लॉकडाउनच्या आधीपासून फिटनेस व इन्शुरन्स थकवलेले आहे, अशांवर कारवाई करण्यात येणार आहे. रिक्षाचालकांना रिक्षा चालवताना बॅच बिल्ला, लायसन, परमिट व आपला ड्रेस आवश्यक असणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.