अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-महाभकास आघाडीचे राज्याचे नेते तुम्ही स्वत:ला समजता, तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा, असे थेट आव्हान पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिले.
कालपर्यंत निळवंडे प्रश्नांवरून आम्हाला बदनाम करणारी मंडळी आता उशिरा का होईना कालव्यांच्या कामाबाबत खरे बोलू लागल्याने त्यांच्या तालावर झेंडे घेऊन नाचणाऱ्यांनी आतातरी डोळे उघडावीत, असा सल्ला त्यांनी दिला.
पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब म्हस्के, खासदार डॉ. सुजय विखे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, डॉ. भास्करराव खर्डे,
अपाध्यक्ष विश्वासराव कडू, कैलास तांबे, रामभाऊ भूसाळ, अण्णासाहेब कडू, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे व सर्व संचालक याप्रसंगी उपस्थित होते. कारखान्याचे सभासद ऑनलाइन पद्धतीने या सभेत सहभागी झाले होते.
विविध विषयांचे ठराव या सभेत सर्वानुमते मंजुर करण्यात आले. समन्यायी पाणी वाटपाचे भूत या जिल्ह्याच्या मानगुटीवर अनेक वर्षे बसले. त्यावेळी सत्तेत बसलेल्या मंडळींनी जिल्ह्यातील पाणी वाहून जात असतानासुद्धा शब्द काढला नाही.
सत्ता गेल्यानंतर पाणी देण्यास विरोध करू लागले. आता सत्ता तुमच्याच ताब्यात आहे, महाभकास आघाडीचे तुम्ही नेते आहात, या कायद्याबाबत तुम्ही बोलत का नाही? असा प्रश्न करून, आमदार विखे म्हणाले, समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करण्याची जबाबदारी आता तुमची आहे.
वर्षानुवर्षे रखडलेल्या निळवंडे धरण कालव्यांच्या कामांची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच झाली. मागील १० वर्षे ही कामे धरणाच्या मुखापासून सुरू होऊ शकले नाही. काहींना ही कामे सुरू होऊ द्यायची नव्हती.