अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News :-केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल निर्माण झालेला असंतोष कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दानवेंचा राजीनामा घ्यावा.
दानवे यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा जालना येथे त्यांच्या घरासमोर मुंडण आंदोलन करण्याचा इशारा नाभिक महामंडळाने दिला आहे.
यासंबंधी नाभिक महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
जालना येथील एका भाषणात दानवे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना तिरुपती येथील नाभिकांचे उदाहरण दिले होते.
याला राज्यभरातील नाभिक समाजाकडून हरकत घेण्यात आली आहे. नाभिक महामंडळाने म्हटले आहे की, राजकीय भाषणे देताना बहुजन समाजाची उदाहरणे देण्यासाठी बहुजन समाजातील जाती दानवे यांच्या जहागिरी नाहीत.
तीन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही असेच आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दानवे यांनी आठ दिवसांत नाभिक समाजाची माफी मागावी अन्यथा जालना
येथे दानवे यांच्या घरासमोर राज्यातील नाभिक समाज एकत्रित येऊन मुंडण आंदोलन करतील. ते केस दानवे यांना दान करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.