अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- कोल्हार येथील एका कार्यक्रमात स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवला.
तसेच सरकार शिवसेनेचे असताना मुख्यमंत्र्यांचा फोटो बॅनरवर नसल्याचं सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिलं. जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वातील आंदोलक शिवसैनिकांनी अब्दुल सत्तार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली.
ना. अब्दुल सत्तार यांनी कोल्हार भगवतीपूरमध्ये प्रवेश करताच कमानीजवळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह शिवसैनिकांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविला.
जिल्हा परिषदेचा कार्यक्रम असतानाही निमंत्रण पत्रिकेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो नाही. तसेच शिवसेनेचे मंत्री येथे येत असतानादेखील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, स्थानिक पदाधिकारी यांना कोणतीही माहिती नाही.
शिवसैनिकांना विश्वासात घेतले गेले नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली. भविष्यात जिल्ह्यामध्ये कार्यक्रम असल्यास शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्यांना विश्वासात घेतले जाईल असे सांगून ना. सत्तार यांनी यावेळी दिलगिरी व्यक्त केली.
भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे आणि शिवसेना नेते व राज्यमंत्री अब्दुल सत्तार अहमदनगरमधील या कार्यक्रमात एकत्र आल्यानं राजकीय चर्चांनाही उधाण आलं. यावरुन अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत.
त्यात शिवसैनिकांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला डावलल्याचा आरोप करत थेट सत्तार यांची गाडी अडवल्यानंही या चर्चेत भरच पडलीय.