अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- ‘आम्ही आर्मीमध्ये आहोत’, तुम्हाला काय करायचे ते करा, तुमच्या नोकर्याच घालवतो असा दम देत पोलिसांचे शर्ट पकडून त्यांच्या अंगावर हात टाकुन ग्रामस्थांना मारहाण करणाऱ्या पर्यटकांना स्थानिक रहिवाशांनी चांगलाच चोप दिला.
ही घटना भंडारदरा परिसरात घडली. सध्या अनेक पर्यटक भंडारदरा धरण परिसरात येत आहेत. दरम्यान काल भंडारदरा धरणामध्ये एक पर्यटक बुडाल्याची खबर राजूर पोलिसांना लागली असता ते सायंकाळी ५ वाजता घटनास्थळी दाखल झाले
मात्र बुडालेल्या पर्यटकाचा शोध न लागल्याने ते परतत असताना काही पर्यटकाची दारूच्या नशेत पोलिसांना दमबाजी व शिविगाळ करत होते. ही बाब स्थानिक व्यावसायिक प्रकाश खाडे यांच्या लक्षात आली.
ते मध्यस्ती करत असताना या पर्यटकांनी प्रकाश खाडे याला जबर मारहाण करत पोलिसांनाही शिविगाळ केली. आम्ही कायदा मानत नाही,असे म्हणत मद्य धुंदीत असलेल्या सैन्य दलातील दोघे र व इतर तिघे असे पाच व्यक्तींनी धिंगाणा घालून ग्रामस्थ व पोलिसांना मारहाण केली.
यामुळे संतप्त झालेले भंडारदरा ग्रामस्थ व पोलिसांनी एकत्र येत त्यांच्या मुसक्या आवळून राजूर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.