अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  बाजार समिती नेप्ती उपबाजारात हलवून नगरची जागा विकण्याचा काहींचा डाव आहे. नाव दादा पाटलांचे मात्र कारभार भलताच सुरू असल्याची टीका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी बाजार समितीच्या नेत्यांवर व संचालक मंडळावर केली.

नगर बाजार समितीला आलेल्या कारणे दाखवा नोटीससंदर्भात तालुका महाविकास आघाडीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जि. प. सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले म्हणाले , बाजार समितीमधील ज्या मुद्द्यांच्या आधारे नोटीस निघाली त्याला उत्तर देण्याऐवजी व्यक्तिगत टीका केली गेली. आम्ही तक्रारदार असल्यानेच नोटिसा मिळाल्या. आम्ही कधीच सत्तेचा दुरुपयोग केला नाही.

उलट भाजपच्या काळात चौकशी झाली. त्यांनीच सत्तेचा वापर करत चौकशी अहवाल दडवून ठेवला. आम्ही दुरूपयोग केला असता तर बाजार समिती केव्हाच बरखास्त झाली असती.

म्हणून कारणे दाखवा नोटीस पाठवली जिल्ह्यातील नगर तालुका बाजार समितीमध्ये अनेक घोटाळ्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत. 2018 पासून बाजार समितीची दोन चौकशी समित्यांमार्फत चौकशी सुरु आहे.

याच चौकशी समितींच्या अधिकार्‍यांनी चौकशी अहवाल सादर केला आहे. त्याच अनुषंगाने सरकारने बाजार समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.