अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-नगर शहरासह जिल्ह्यात लुटमारी, चोऱ्या, आदी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसाढवळ्या चोरटे नागरिकांना लुटत आहे यामुळे या भामट्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही असेच दिसून येत आहे.
नुकतेच आमदार रोहित पवार यांच्या मतदार संघात चोरटयांनी अक्षरश धुमाकूळ घेतला आहे. यामुळे नागरिक देखील भयभीत झाले आहे. जामखेड तालुक्यात अनेक गावात चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यातच खर्डा शहरात एकाच ठिकाणी एकाच दिवशी पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या तर दोन मोटरसायकली चोरीचे प्रयत्न झाले.
खर्डा येथे एकाच दिवशी पाच ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवार दि.१४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी खर्डा शहरातील कसाब दिल्ली येथील शेख चांद अब्दुल शेख यांच्या घरातील नऊ हजार रुपये रोख रक्कम तर शुक्रवार पेठेतील सविता बाळासाहेब खरात यांच्या घरातील ४९ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी घरफोडी करून चोरून नेली
आहे. तसेच खर्डा येथील सुर्वे गल्लीतील बाळासाहेब जनार्दन वाळुंजकर, सुरेश राजाराम ढेरे, भगवान बापूराव वाळुंजकर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सामानाची उचकापाचक करून घरातील सामान फेकून चोरट्यांनी पोबारा केला. परंतु या तीन घरातील लोक बाहेरगावी असल्याने किती रक्कम चोरून नेली हे अद्याप पर्यंत गुलदस्त्यात आहे.
तसेच शुक्रवार पेठेतील प्रकाश हरिभाऊ सोनटक्के व जालिंदर हरिभाऊ सोनटक्के यांच्या मोटरसायकली चोरून नेल्या, परंतू त्यांनी कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी तेथेच त्या मोटरसायकल सोडून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती समजताच खर्डा पोलीस नाईक संभाजी शेंडे व पोलीस कॉन्स्टेबल शेषराव म्हस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याबाबत अद्याप पर्यंत पोलीस स्टेशनला कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. यासंदर्भात आ.रोहित पवार यांनी जामखेड पोलीस स्टेशनला नवीन पेट्रोलिंगसाठी गाड्या दिल्या आहेत. त्याचा उपयोग रात्रीच्या गस्तीसाठी करावा अशी मागणी खर्डा ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.