साईसमाधी मंदीर दर्शनासाठी बंद असतानाही झाले असे काही… शिर्डीतील नागरिक नाराज !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईसमाधी मंदीर दर्शनासाठी बंद असतानाही साई संस्थान तदर्थ समितीचे पदाधिकारी नियमांचे उल्लंघन करत सहकुटूंब व नातेवाईकांसह साईमंदीरात आरतीस उपस्थित राहिल्याचे समोर येताच शिर्डीतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या संवेदनशील प्रश्नावर माहिती अधिकार कार्यकर्ते गप्प का असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संस्थानच्या तदर्थ समितीची शिर्डीत नुकतीच बैठक झाली. या बैठकीनंतर समितीचे पदाधिकारी व एका सदस्याने आपल्या नातेवाईकासह साईमंदीरात आरतीला हजेरी लावली.

याबाबतची माहिती समोर आल्यानंतर शिर्डीत संताप व्यक्त करण्यात आला. या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या बैठकीला माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवसेनेचे कमलाकर कोते, राष्ट्रवादीचे रमेश गोंदकर,

सुधाकर शिंदे, भाजपाचे नितीन उत्तम कोते, अशोक खंडू कोते यांच्यासह विविध सामाजीक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायद्याचे रक्षणकर्तेच कायद्याची पायमल्ली करत असतील तर सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

माहिती अधिकार कायद्याचा वापर करून संस्थान, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्तांना वेठीस धरणारे या प्रश्नावर गप्प का, नियमभंग प्रकरणी आता ते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज किंवा पत्रव्यवहार करणार का असा सवालही उपस्थीत करण्यात आला

अहमदनगर लाईव्ह 24