मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या बापासोबत झाले असे काही…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर जवळील गांजावाडी जवळ असलेल्या मंडपी नाला येथे आज दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या मुलाला वाचविताना वडीलांसह लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर त्यांच्यासोबत असलेले आणखी दोघे जण सुदैवाने सुखरूप वाचले आहे.

या घटनेत वडील संजय मारुती मोरे (वय 35 वर्ष), मुलगा सचिन संजय मोरे (वय 15 वर्ष) रा. गांजा वाडी या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ओम मोरे व शुभम योगेश पवार या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. हे चौघे मंडपी नाला येथे गेले असता सचिन संजय मोरे हा पाण्यात बुडत असतांना त्याला वाचविण्यासाठी त्याच्या वाडीलांसह त्यांच्या सोबत असलेल्या दोघांनी पाण्यात उडी मारली असल्याचे समजते.

सदर घटनास्थळी तहसीलदार विजय बोरुडे, कोपरगाव शहर ठाण्याचे पो.नि. वासुदेव देसले, संजिवनी कारखान्याची आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी हजर होते. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी दोन्ही मृतांना बाहेर काढले असून शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.

सदर चौघे जण या ठिकाणी नेमके कशासाठी गेले होते हे मात्र अजून नक्की समजू शकले नाही. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे. सदर घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.