काहीतरी गडबड आहे; राज्यातील सरकार कधीही कोसळणार…?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- काहीतरी गडबड सुरू असल्याने राज्यातील सरकार कोणत्याहीक्षणी पडू शकते, असा गौप्यस्फोट माजी जलसंधारणमंत्री व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

माजीमंत्री राम शिंदे यांनी या वेळी स्वत: रक्तदान करून उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस कर्जतमध्ये सेवा व समर्पण दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

समर्पण म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपाच्या वतीने सर्वत्र सेवा व समर्पण दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून, मीदेखील रक्तदान करून समर्पण देण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त मला रक्तदान करण्याचा योग आला, हे माझे भाग्य समजतो. या वेळी पत्रकारांनी राज्यातील घडामोडींवर विचारले असता, प्रा. राम शिंदे म्हणाले की,

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत समर्पक उत्तर दिले आहे, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री यांनी भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री व पक्षाचे

नेते रावसाहेब दानवे यांच्यासह आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमधील कार्यक्रमात याबाबत संकेत दिले आहेत, यावरून हे सरकार कधीही कोसळू शकते, असेही प्रा. शिंदे या वेळी म्हणाले.

Ahmednagarlive24 Office