अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- पती – पत्नीच्या वादातून पत्नीने भावाच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. ही घटना नगर तालुक्यातील वाळुंज फाटा येथील मोरे वस्तीवर शनिवारी रात्री एक वाजता घडली.
संतोष दत्तु मोरे (वय ४२ रा. वाळुंज ता. नगर) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मयत संतोष यांची पत्नी प्रियंका ऊर्फ शारदा संतोष मोरे (रा.मोरे वस्ती वाळुंज ता.नगर) व मेव्हणा रामेश्वर विठ्ठल दशवंत (रा.ताहराबाद ता. राहुरी) यांच्याविरूद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप सोपान मोरे (वय ३९ रा. वाळुंज ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक डी. आर. जारवाल यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.संतोष मोरे हा पत्नी प्रियंकाला घरगुती कारणावरून नेहमी त्रास देत होता.
यामुळे त्यांच्यात कायमच वाद होत होते. शनिवारी रात्री प्रियंकाने आपला भाऊ रामेश्वर दशवंत याला घरी मोरे वस्ती येथे बोलवून घेतले.
संतोष व रामेश्वर यांच्यात शनिवारी रात्री वाद झाले. रामेश्वर व प्रियंका यांनी संतोष यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रामेश्वर याने संतोष यांच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाडीचा तुंब्याकडील बाजू मारून जखमी केले.
संतोष यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक जारवाल यांच्या पथकाने आरोपी रामेश्वर दशवंत व प्रियंका मोरे यांना अटक केली आहे.