अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- कोरोना संसर्ग वाढत असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे डोळेझाक करणार्यांवर आता कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. विविध मंगल कार्यालये, लॉन्स येथे आता पोलिसांचा खडा पहारा राहणार असून पन्नास पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
त्याबरोबरच शहर व जिल्ह्यातील हॉटेल्सना पन्नास टक्के क्षमतेने चालविण्याची परवानगी दिली असताना तेथेही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी संबंधितांनाही नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सोमवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संवाद साधून कोरोना विषयक परिस्थिती जाणून घेतली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्तव्यकठोर होऊन उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणीचे आदेश दिले. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेन्द्र क्षीरसागर, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, संदीप सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी दादासाहेब भोसले, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदींची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, सध्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. ही परिस्थिती आणखी तीव्र होणार नाही, यासाठी नागरिकांनी स्वताहून काही बंधने निश्चितपणे घालून घेणे गरजेचे आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. घराबाहेर पडताना चेहर्यावर मास्क लावा. हात वारंवार धुवा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. विविध मंगल कार्यालये, लॉन्स आदी ठिकाणी प्रशासनाने ठरवून दिलेल्या व्यक्तीसंख्येपेक्षा जास्त व्यक्ती असल्याचे दिसून आल्याने प्रशासनाने आता निर्बंधांची कडक अंमलबजावणीच्या सूचना दिल्या आहेत. येत्या १५ मार्चपर्यंत जिल्ह्यात ४४ मंगल कार्यालये, लॉन्स, मॅरेज हॉल आदी ठिकाणी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आता या ठिकाणी लग्न समारंभावेळी पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील हॉटेल्स, फूड कोर्टस, रेस्टॉरंटस, बार आणि तत्सम अनुज्ञप्ती यांना ५० टक्के क्षमतेने ते सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, नियमांचे उल्लंघन करणार्या अशा आस्थापनांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश डॉ. भोसले यांनी पोलीस यंत्रणेला दिले आहेत.
शहरी व ग्रामीण भागात काही ठराविक परिसरात सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत असेल तर तेथे परिसरातील व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंघ लागू करण्यासाठी कन्टेन्टमेंट झोन तयार करणे आणि नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी महानगरपालिका तसेच सर्व तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.
सध्या जिल्ह्यातील शाळा – महाविद्यालये सुरु आहेत, त्या ठिकाणची किती विद्यार्थी कोरोना बाधित झाले आहेत. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महानगरपालिका आरोग्यअधिकारी यांनी कोविड रुग्णांच्या चाचण्यांचे पृथ:क्करण करुन तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. अहवालानंतर शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील काही रुग्णालयांमध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिकांद्वारा फ्ल्यूची लक्षणे असणार्या कोरोना संशयित रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी न करता एचआरसीटी करुन उपचार केले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा रुग्णांची आरटीपीसीआर चाचण्या करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.