अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- खेळाडू स्वतःच्या जिद्दीवर आणि आई-वडिलांच्या भक्कम पाठबळावर नांव कमवतात. त्यामुळे ते ज्या शहरात राहतात त्या शहराचे नांव मोठे होते.
पण नीलने अतिशय कमी वयात समुद्राला दिलेली टक्कर व त्याच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झालेली नोंद यामुळे नील हा आपल्या शहरापुरता मर्यादित न राहता तो महाराष्ट्राचा सुपुत्र झाला आहे.
आम्हाला त्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी काढले. त्यांच्या हस्ते नुकताच नीलचा सन्मान करण्यात आला. नील सचिन शेकटकरचे नांव सुप्रसिध्द इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदले गेले.
सर्वात कमी वेळेत समुद्री अंतर पार करणारा अकरा वर्षीय नील शेकटकर हा सर्वात कमी वयाचा जलतरणपटू ठरला आहे. त्या बद्दल त्याचा नागरी सत्कार आयोजीत करण्यात आला होता. नील हा मुळचा अहमदनगर शहरातील असून, सध्या तो आपल्या आई-वडिलांसह पुणे येथे राहत आहे.
या कामगिरीबद्दल त्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजीत पवार यांनी देखाल सन्मान केला. एलिफंटा केव्हज् ते गेट वे ऑफ इंडिया हे 15 किलोमीटरचे समुद्री अंतर दोन तास पंचेचाळीस मिनिटांत पूर्ण करून नील शेकटकरने नवीन विक्रम स्थापित केला.
वयाच्या अकराव्या वर्षीच नीलने ही कामगिरी केली आहे. हेच अंतर पूर्ण करायला पूर्वीच्या जलतरणपटूला तीन तास पस्तीस मिनिटे लागली होती. हा विक्रम मोडित काढल्याने नीलच्या या यशाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस या भारत सरकारमान्य संस्थेने घेतली आणि त्याचे नांव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या आवृत्तीमध्ये नोंद केली आहे.
भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, कलाकार यांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसद्वारे घेतली जाते. त्यामुळे नीलच्या कारकीर्दीतला हा महत्त्वाचा टप्पा आहे. या विक्रमासाठी नीलचे प्रशिक्षक गोकुळ कामत, अमित आवळे आणि किशोर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.