अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार विभागामध्ये सोयाबीनची आवक सुरु झाली आहे. यात बुधवारी 500 से 600 डाग आवक आली आहे. यात सोयाबीनला 5 हजार ते 6 हजार 300 प्रति क्विंटल भाव मिळाला.

शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी 10 ते 12 हजार प्रति क्विंटल भाव सोयाबीनला मिळाला होता.

मात्र मागील पाच दिवसांत सोयाबीनच्या दरामध्ये तब्बल तीन ते चार हजार रुपयाची घसरण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पदरी या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात निराशाच पडली आहे. अचानक दर घसरल्यानं शेतकरी चिंतातूर झाला आहे.

या कारणामुळेच सोयाबीनचा हंगाम असूनसुद्धा आवकीवर परिणाम झाला आहे. मागील हंगामात शेवटच्या काळामध्ये सोयाबीनच्या दरात चांगलीच वाढ पहावयास मिळाली होती. दर दहा हजाराच्या पुढे गेले होते.

या कारणामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनकडे वळला होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी देणारे पिके म्हणून सोयाबीनकडे पाहिले जात आहे. मात्र भाव घसरला असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.