यंदाच्या वर्षी सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता… ‘हे’ आहे कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने उत्पादनात घट आली आहे. याच कालावधीत ढगाळ वातावरणाने पिकावर रोगाचा परिणाम झाला. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात मोठी घट होणार आहे.

यामुळे बियाणे, शेतीची मशागत, पेरणी, कीटकनाशक औषधांची फवारणी याला मोठा खर्च आला. मात्र उत्पन्न अल्प झाले आहे. यंदा जिल्ह्यात तब्बल ९९ हजार ४१७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. मात्र पाऊस लांबल्याने व सध्या त्यावर पडलेल्या रोगाने शेतकरी त्रस्त बनले आहेत.

त्यामुळे उत्पादनातही पन्नास टक्क्याहून अधिक घट होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात वेळेवर पाऊस झाला. त्यातच सोयाबीनला विक्रमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी या पिकाकडे वळले. तब्बल ९९ हजार ४१७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला.

पीकही जोमात आले. मात्र त्यानंतर पाऊस लांबला व पिवळा मोझेक रोग पडल्याने शेतकरी त्रस्त बनले आहेत. हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणूंमुळे उद्भवतो. यावर्षी पावसाने दडी मारल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून या वर्षी सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे चित्र सध्या दिसुन येत आहे.

मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच राज्यभरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे यंदा खरीपाचे पीक चांगले येणार अशी शेतकरी वर्गाला अपेक्षा होती. परंतु पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा पार धुळीस मिळण्याची चिन्हे दिसून येत आहेत.