Ahmednagar News : दिवसाढवळ्या शहरात तडीपार फिरत असतील तर पोलिसांची दहशत कशी राहील? पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी पडु नये. एसपी साहेब हिसका दाखवा. मवाळ राहू नका, असे खासदार डॉ.सुजय विखे म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुजय विखे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आ.बबनराव पाचपुते, आ.लहू कानडे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी. जी.शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.
तर सभागृहात शांतता कमिटीचे सदस्य आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, जिल्ह्यात ज्ञानेश्वरी निर्माण झाली, श्रद्धा-सबुरीचे संदेश देणारे साईबाबा इथलेच, शनिशिंगणापूर, मोहटादेवी, बुद्धीदाता अष्टविनायकातील सिद्धटेक गणपती असा सारा आध्यात्मिक विचारांचा वारसा असताना जिल्ह्यात अशांतता होत असेल, तर त्यावर सर्वांनी आत्मचिंतन करावे.
मिरवणुकांबाबत नवीन सूचनांची आचारसंहिता तयार करावी. गुन्हेगारी मोडण्यासाठी पोलिसांना पूर्ण पाठबळ आहे, मोकळीक आहे, असे नमूद करताना ज्यांना उत्सव करायचे त्यांनी स्वतःच्या हिमतीवर करावे, वर्गणी हवीच कशाला?
असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. या प्रदीर्घ बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या सूचनांचा नामदार विखे पाटील यांनी मुद्देनिहाय आढावा घेतला. चांगल्या सूचनांचे स्वागत करीत याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
विखे पाटील म्हणाले, डीजे संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे गाईडलाईन जारी केली आहे. परंतु त्या पाळल्या जात नाहीत, हे दुर्देव आहे. बंद पडलेल्या पोलीस चौकी, मोहल्ला कमिट्या रीऑर्गनाइज कराव्या लागतील. यासोबतच सायबर क्राईम ब्रँचच्या युनिटचे सक्षमीकरण देखील केले जाईल. असे विखे म्हणाले.