अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन पुकारले आहे. यामुळे एसटी महामंडळाचे देखील प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.
याचाच मोठा फटका शिक्षण व्यवस्थेला देखील बसू लागला आहे. एसटी संपामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. एकीकडे अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या असलेल्या
शाळा सुरु झाल्या मात्र एसटीच्या संपामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले आहे.त्यामुळे या संपावर तात्काळ तोडगा निघावा आणि लालपरी आपल्या गावी यावी व शिक्षणासाठी तिच्यात बसून जाता यावे अशी अपेक्षा विद्यार्थी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन लवकर निकाली निघेल याची शाश्वती सध्यातरी दिसत नसल्याने विद्यार्थी वर्गाची धाकधूक वाढली आहे. गत दोन वर्षांपासून कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरातील अनेक शाळा व महाविद्यालये बंद होती.
मात्र आता कोविडचे संक्रमण काही प्रमाणात कमी झाल्याने संगमनेरातील शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ऑफलाईन शिक्षणाचा उपयोग होताना दिसत नाही.
अनेक विद्यार्थ्यांना गावी बस येत नसल्याने या शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे एसटीच्या या संपाने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान सुरू आहे. काही दिवसांत परीक्षेचे दिवस येणार असल्याने विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचीही धाकधूक वाढली आहे.