अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- श्रावण महिन्यातल्या तिसर्या सोमवार पासून राज्याती सर्व मंदिरे सुरू न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या अध्यत्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
आचार्य भोसले हे आज संगमनेरमध्ये आले होते. शहरातील विविध मंदिरात जाऊन त्यांनी आरती केली त्यानंतर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भोसले पुढे म्हणाले, करोनामुळे संपूर्ण राज्यात सर्व व्यवहार बंद होते. हळूहळू सर्व सुरू होत आहे.
दारूचे दुकाने सुरू करणारे राज्यातील आघाडी सरकार मंदिर मात्र सुरू करत नाही. सरकारने याबाबत त्वरीत पावले उचलावीत. मंदिरे सुरू न झाल्यास सर्व नियम तोडून मंदिरे उघडले जातील आणि भाविक या मंदिरात प्रवेश करतील असा इशारा त्यांनी दिला.
दारूपासून महसूल मिळत असतो म्हणून ही दुकाने सुरू केली. मोठ्या मंदिरापासूनही मोठा महसूल जमा होत असतो. शिर्डी येथील साई संस्थान मधून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांना मंदिराबाबत काही घेणे देणे नाही. त्यांचे लक्ष फक्त वसुलीकडे आहे.
सोमवारपासून मंदिरे सुरू न झाल्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान सकाळी भोसले यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मंदिर प्रवेश केला.