एक जून पासून बाजारपेठा सुरु करा अन्यथा …!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- एप्रिल महिन्यापासून शहरात लॉकडून सुरु आहे. बाजारपेठा बंद असल्याने सर्व व्यापारीवर्ग अडचणीत सापडला आहे. शहरात आता कोरोना बाधितांची दैनदिन संख्या कमी होत आहे.

त्यामुळे जिल्हा व मनापा प्रशासनाने शहरातील लॉकडाऊन १ जून पासून शिथिल करून काही तास व्यापारी वर्गास दुकाने उघडण्याची परवानगी देवून बाजारपेठ सुरु कराव्यात. यासाठी कडक नियमावली करावी. सर्व व्यापारी वर्ग आपण केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करतील.

जर एक जून पासून बाजारपेठा सुरु झाल्या नाहीत तर भाजपा व्यापारी आघाडी शांत न बसता सर्व व्यापारींच्या समवेत रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा नगर शहर भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या वतीने जेष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिला.

नगर शहर भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्यावतीने जेष्ठ नेते वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना निवेदन देवून १ जून पासुन सर्व दुकानांना वेळेची मर्यादा घालुन व नियमांचे बंधन घालुन दुकाने चालू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली.

यावेळी विलास गांधी म्हणाले, व्यापारी वर्ग शासनाला सर्वात जास्त महसूल देत असतो. मात्र आज लॉकडाऊन मुळे हाच व्यापारी मोठ्या संकटात सापडला आहे. मागच्या वर्षी झालेल्या लॉकडाऊन नंतर सरकाने १ जून पासून बाजारपेठा सुरु केल्या होत्या.

आता करोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने मागच्या वर्षी प्रमाणे शासनाने १ जून पासून व्यापारी वर्गास दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. अन्यथा व्यापारी तीव्र आंदोलन करेल. यावेळी लक्ष्मीकांत हेडा, नितीन जोशी, विजय मुनोत, प्रसाद पटवा आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24