अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलेल्या १२ भाजपा आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे.
सर्वोच्च न्यायालयानं देखील यासंदर्भात निलंबन कायदेशीर नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर हे निलंबन मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकारवर दबाव वाढू लागला होता.
आमदारांविरोधात ६० दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबनाची कारवाई करण्याचा विधानसभेला अधिकार नाही. मात्र, भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले.
वर्षभर निलंबित करणे ही लोकप्रतिनिधीच्या हकालपट्टीपेक्षाही गंभीर शिक्षा म्हणावी लागेल, असे ताशेरे न्यायालयाने गेल्या वेळी झालेल्या सुनावणीत ओढले होते.
अखेर हे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विधिमंडळाने या आमदारांचे एक वर्षासाठी काढून घेतलेले अधिकार पुन्हा बहाल केले आहेत.
या आमदारांवर विधान भवन परिसरात प्रवेश करण्यावर घातलेली बंदी मागे घेण्यात आली आहे. तसेच येणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी त्यांचे तारांकित प्रश्न,
लक्षवेधी व अन्य कामकाजाचे प्रस्तावही स्वीकारण्यात आले आहेत. त्यामुळे हे 12 आमदार विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार हे स्पष्ट झाले आहे.
या आमदारांचे निलंबन संपुष्टात :- आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, संजय कुटे, अभिमन्यू पवार, हरिश पिंपळे, राम सातपुते, पराग अळवणी, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया, योगेश सागर.