अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- नगर-मनमाड महामार्गाची ओळखा खड्डेमार्ग म्हणून झाली आहे. हा मार्ग खड्डयात हरविला असुन या मार्गावर एका पाठोपाठ वाहनधाराकांचे बळी जात आहेत.
वाहनचालकांना या मार्गावरुन जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता होईल तेव्हा होईल, तोपर्यंत खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. कोल्हार ते कोपरगाव दरम्यान या राज्य मार्गाच्या कामास महुर्त लागण्याची चिन्हे दिसत नाही. पावसाळ्यापुर्वी मोठे खड्डे या मार्गावर होते.
पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांच्या आकारमानात मोठी वाढ झाली. या दरम्यान अनेक अपघात झाले. या अपघातात अनेकांचे बळी गेले. काहींना कायमचे अपंगत्व आले. पावसाळ्यानंतर या रस्त्यास डागडुजी करण्यात आली. डागडुजी करताना वापरले गेलेले मटेरियल अत्यंत कमी दर्जाचे वापरले गेले.
अनेक सामाजिक संघटना, पक्ष, कार्यकर्ते यांनी यावर आवाज उठविला; मात्र काम करणाऱ्या ठेकेदरांना याचा काही फरक पडला नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या नित्कृष्ट कामाचा दर्जा खड्डे बजविण्याच्या कामातुन दाखवुन दिला. वारंवार तेच ठेकेदार, तेच कागार यामुळे कामाचा दर्जा हा नेहमीप्रमाणे असणार यात काही शंका नाही.
पुढे खड्डे बुजविताना मागील खड्डे पुन्हा जैसे थे झाले. केवळ मातीमिश्रीत मुरुम खडयात टाकुन त्यावर थोडी खडी व डांबर टाकण्याचा देखावा केला गेला. दोन दिवसापुर्वी कोपरगावकडे जात असलेल्या एका तरुण शिक्षकाचा अपघात होऊन ते गतप्राण झाले. रस्त्याचे काम सुरु होईल तेव्हा होईल पहिले खड्डे चांगल्या दर्जेदार पध्दतीने बजविण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.