सभासदाला माहिती देण्याचे डॉन बॉस्को पतसंस्थेस राज्य माहिती आयोगाचा आदेश

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :-  शहरातील डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्थेस राज्य माहिती आयोगाने सभासदाला विनामुल्य पतसंस्थेच्या सभेचे इतिवृत्त व अहवाल विनामुल्य देण्याचे आदेश काढले आहे.

यावरुन पतसंस्थेच्या सभासदांना माहिती घेण्याचा अधिकार असल्याचा स्पष्ट होत आहे. डॉन बॉस्को नागरी सहकारी पतसंस्थेचे सभासद रमेश बाबुराव आल्हाट यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती अधिकारात पतसंस्थेचे इतिवृत्त व अहवाल मिळण्याबाबत अर्ज केला होता.

माहिती अधिकार अधिनियम 2005 पतसंस्थांना लागू नसल्याचे कारण देत सभासदाला माहिती देण्यात आली नाही. यानंतर आल्हाट यांनी तालुका उपनिबंधकाकडे सदर माहिती मिळण्याची मागणी केली होती. यावर 22 जानेवारी रोजी सभासदास माहिती देण्याचे आदेश तालुका उपनिबंधकांनी सदर पतसंस्थेस दिले.

तरी देखील पतसंस्थेने हा आदेश धुडकावून लावला. माहिती मिळत नसल्याने आल्हाट यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपील दाखल केले. या अपीलची तातडीने दखल घेत राज्य माहिती आयोगाने सभासदांना संस्थेची माहिती मिळण्यासाठी मागितलेली माहिती विनामुल्य देण्याचा आदेश काढला.

या आदेशान्वये आल्हाट यांना पतसंस्थेच्या सभेचा इतिवृत्त व अहवाल प्राप्त झाला आहे. यावरुन पतसंस्थेच्या सभासदांना आपल्या संस्थेची माहिती घेण्याचा पुर्ण अधिकार असल्याचे आल्हाट यांनी म्हंटले आहे.

Ahmednagarlive24 Office