पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या भुजबळांना प्रदेशाध्यक्ष पटोलेंची २४ तासांच्या आत नोटीस !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आयटी पार्कच्या प्रकरणामध्ये पोलखोल करत शहराच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना घेरले आहे.

काळे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते बाळासाहेब भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांमधून जाहीर पत्रकबाजी करत आयटीपार्क प्रकरण किरण काळे व्यक्तीद्वेषाने हाताळत असून काळे यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नाही असे वक्तव्य केले होते.

भुजबळ यांच्या या पक्षविरोधी वक्तव्याची गंभीर दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या आदेशाने भुजबळ यांना आपणास काँग्रेस पक्षातून निलंबित का करू नये अशी नोटीस मुंबईतून बजावली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे त्यातील घटक पक्ष आहेत.

दोन्ही पक्षांमधील सुरू असणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते असणारे भुजबळ यांनी काँग्रेस पक्ष किरण काळे यांच्या मताशी सहमत नसल्याचे म्हणत पक्षांतर्गत दूही माजवण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर दखल प्रदेश काँग्रेसने घेत त्यांनी केलेल्या वक्तव्या नंतर २४ तासांच्या आत त्यांना आपल्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये

अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले आणि प्रदेश काँग्रेस ही शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्यामुळे पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची अडचण झाली आहे.

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भा.ई. नगराळे यांनी बाळासाहेब भुजबळ यांना नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वेळोवेळी जी आंदोलने आणि कार्यक्रम आयोजित केले जातात त्याच्या विरोधी भूमिका घेऊन आणि परस्पर माध्यमांत त्यास प्रसिद्धी देऊन

आपण वारंवार पक्षशिस्तीचा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून आपणास कळविण्यात येते की आपली ही कृती गंभीर असून आपणास या बाबतीत काँग्रेस पक्षातून निलंबित का करू नये याचा खुलासा पुढील सात दिवसांच्या आत करावा.

अन्यथा याबाबत आपणास काहीही म्हणायचे नाही असे गृहीत धरून आपणा विरुद्ध पक्ष शिस्तीचा भंग केल्याबद्दल पुढील कारवाई करण्यात येईल. भुजबळ यांच्यावर प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांनी कारवाईचा बडगा उगारल्यामुळे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी घेतलेल्या भूमिके विरोधात भूमिका घेणाऱ्या काँग्रेस पक्षातील अंतर्गत मंडळींचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

भुजबळ यांनी केलेल्या पक्षविरोधी कारवाया पाहता त्यांच्या खुलाशा नंतर त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई अटळ असल्याची चर्चा यामुळे शहरात सुरू झाली आहे.

बैठकीपूर्वीच भुजबळांना नोटीस : आयटी पार्कच्या संदर्भात शहर काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांची मते आजमावून पक्षश्रेष्ठी समोर ती मांडणार असल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले होते. मात्र ही बैठक घेण्यापूर्वीच प्रदेश काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारल्यामुळे बाळासाहेब भुजबळ यांची नाचक्की झाली आहे.