अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- गावठी दारू तयार करणाऱ्या टोळीने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीत घडली आहे.
या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाची काच फुटली. मात्र, सुदैवाने एकही पोलीस कर्मचारी जखमी झाला नाही.
याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी सुरेश पवार, राजू पवार, विजय पवार यांच्या विरोधात दारूबंदी गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलवंडी पोलिसांचे पथक बेलवंडी शिवारातील गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी गेले होते.
दारूभट्ट्या फोडल्याचा राग धरून अंधारात जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
मात्र, काच फोडल्याची घटना गुलदस्त्यात ठेवली. ही घटना पोलिसांनी का गुलदस्त्यात ठेवली, याचे कारण मात्र समजलेले नाही.
दारूभट्टी उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या वाहनावर दारू विक्रेते हल्ला करतात. मग पोलिसांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान व सरकारी कामात अडथळा असा गुन्हा दाखल का केला नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.