अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- अखिल भारतीय छावा संघटनेचे नगर जिल्हाकार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंर्त्यांना तहसिलदार यांच्या माध्यमातून व ऑनलाईन अर्ज करुन व्यावसायिक कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ मिळावी व लॉकडाऊन काळात व्यवसायिक दुकानांचे लाईट बिल माफ करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०२० या सालात करोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यापाऱ्यांचे पूर्ण वर्ष नुकसानीत गेले होते. मागील वर्षाचा झालेले नुकसान भरून काढता काढता २०२१ लागले.
सर्वसामान्य व्यापारी कसाबसा या परिस्थितीशी झुंज देत व्यवसाय करत होता. त्यात पुन्हा लॉकडाऊन पुकारल्यामुळे सर्व सामान्य व्यावसायिक पूर्णपणे हवालदिल झाले आहे.
सरकारच्या अवाहनाला दाद देत छोटे मोठे व्यापारी आपले व्यवसाय बंद देखील ठेवणार आहेत. परंतु व्यवसाय बंद ठेवून देखील दुकानातील लाईट बिल,कामगारांचे पगार,जागेचे भाडे,व्यापारी देणे तसेच व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते भरावी लागणार आहेत.
व्यवसाय बंद असल्यानंतर व्यापारी कुठलेही देयके भरू शकणार नाहीत,तसेच बँक कर्जाचे हप्ते देखील भरू शकणार नाहीत. व्यावसायिक कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे सदर कर्ज खाते थकीत मध्ये जाणार आहे.
कर्ज खाते थकीत गेल्यामुळे भविष्यकाळात व्यवसायिकांना बँका व्यावसायिक कर्ज देण्यास टाळाटाळ करणार आहेत.
त्या कारणाने मुख्यमंत्रांनी ज्या कर्ज खातेदारांची बँक कर्ज हप्ता भरण्याची परिस्थिती नाही अशा व्यवसायिकांना कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी व संबधित कर्ज खाते थकीत मध्ये जाणार नाही,
अशी तरतूद करावी.तसेच बंद काळातील दुकानांचे लाईट बिल माफ करावे,अशी मागणी लांबे यांनी केली आहे.