अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपला पोटशूळ उठला आहे. त्यातूनच रोज एका मंत्र्यांवर आरोप करत सुटले असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर व्देषातून किरीट सोमय्यांनी आरोप केले
आहेत, सवंग लोकप्रियता व भाजप प्रदेशाध्यक्षांना बरे वाटावे म्हणून कोणी बदनामी करत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा `गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील,
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष के. पी. पाटील व जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, आर. के. पोवार, माजी चेअरमन ए. वाय. पाटील, यांनी दिला आहे.
कागलच्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी उभी हयात घालवली. मिळेल त्या खात्याचा वापर सामान्य माणसासाठी कसा करता येईल, हेच त्यांनी आतापर्यंत पाहिले.
कागल, उत्तूर परिसरातील शेतकऱयांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य देण्यासाठी त्यांनी संताजी घोरपडे कारखान्याची उभारणी केली. हजारो शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे या कारखान्याच्या उभारणीत आहेत.
मात्र, सत्ता गेल्याने सैरभैर झालेल्या काही मंडळींनी किरीट सोमय्यांचे यांचे कान भरुन आरोप करायला लावले. यातून काहीही निष्पण होणार नाही.
असा दावा प्रसिद्धी पत्रकात केला आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या कंपनीने बिनबुडाचे आरोप थांबवावेत, अन्यथा जशाच तसे उत्तर देऊ. असा इशारा पत्रकात दिला आहे.