Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या केल्या आहेत. बंडखोरी करून त्यांच्या गटात जाण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून राजकीय तसेच कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्या आहेत.
मात्र, नगरमधील महिला आघाडीच्या प्रमुख स्मिता अष्टेकर यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच काळे फासण्याचा इशारा दिला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना अष्टेकर यांनी हा इशारा दिला आहे.
त्या म्हणाल्या, ‘नगर शहरातील कोणी नगरसेवक शिंदे गटासोबत गेल्यास ते दिसतील तेथे महिला आघाडीतर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना स्टाइलने आंदोलन करून बंडखोरांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल.
हा खेळ थांबला नाही तर थेट मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल,’ असा इशाराही त्यांनी बंडखोरी करू पाहणाऱ्यांना दिला आहे. अष्टेकर या ठाकरे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात.
त्यांनी नगर शहरात शिवसेनेमार्फत अनेक आक्रमक आंदोलनेही केली आहेत. बऱ्याच काळानंतर त्यांनी पुन्हा अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. तीही त्यांना त्यांच्याच पक्षातील बंडखोरीच्या वाटेवर असलेल्या लोकांच्या विरोधात घेण्याची वेळ आली आहे.