अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- अमृत भुयारी गटार योजनेचे काम अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात या योजनेंतर्गत खोदकाम केले आहे. पावसामुळे तेथे चिखल झाला आहे. वाहन चालवणे अवघड झाले आहे.
त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत ही कामे थांबवावी, असे पत्र उपमहापाैर गणेश भोसले यांनी आयुक्त शंकर गोरे यांना दिले.खोदकाम झाल्यानंतर ती माती रस्त्यावर टाकण्यात आली आहे. पावसाच्या पाण्यामुळे चिखल होऊन रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत आहेत.
नागरिकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. भुयारी गटार योजनेचे काम जेसीबी यंत्राच्या साहाय्याने केल्यामुळे मध्यवर्ती शहरांमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे.
त्यामुळे अमृत भुयारी गटार योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत थांबविण्याच्या सूचना उपमहापौर भोसले यांनी केली आहे. आयुक्त शंकर गोरे यांनी दिलेल्या आदेशानंतर ठेकेदाराने पूर्वी केलेल्या संबंधित कामाची अटी व शर्तीनुसार डांबरीकरणाने व काँक्रिटीकरणाने पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे कामे करावे.
रस्त्यावर साचलेले मातीचे ढिगारे उचलून पूर्ण झालेल्या गटारींची जोडणी करावी, असेही भोसले यांनी म्हटले आहे.