‘तुमची नौटंकी बंद करा ; अन बाजारपेठ सुरू करा’ काँग्रेसचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-राष्ट्रवादीचे शहराचे लोकप्रतिनिधी नगर शहरातील व्यापारी आणि सामान्य नगरकरांना वेड समजतात का ? तुम्हीच मनपा प्रशासनाच्या आडून आडवा पाय घालून बंद पाडलेली बाजारपेठ आता मनपाला सुरु करायला सांगा. नौटंकी बंद करा.

काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यापाऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. नगर शहरातील बाजारपेठ बंद आहे. या बंद असलेल्या बाजारपेठे संदर्भात यापूर्वी मनपा आयुक्तांनी खुली करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मनपा प्रशासनावर दबाव आणला जात आहे.

आयुक्तांना त्यांचा निर्णय दबावामुळे मागे घ्यावा लागला होता. यामध्ये यांचा हाच हेतू होता की व्यापाऱ्यांना आपल्या दारात नाईलाज निर्माण करून गुडघे टेकायला लावायचे. कुटील राजकारण करण्यात ते यशस्वी झाली आहे, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.

परंतु नगरकर आणि व्यापारी बांधव मूर्ख नाहीत. आपण केलेला डाव हा आपल्यावरच उलटला आहे. व्यापाऱ्यांना खरं काय ते समजलं आहे. फक्त दहशतीमुळे कुणाला बोलायचं सोय नाही एवढेच, असा टोला किरण काळे यांनी लगावला आहे.

अशा संकट काळामध्ये व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना वेठीस धरणे हे लोकप्रिनिधीला शोभत नाही. त्याची निंदा करावी तेवढी कमी आहे, असे म्हणत काँग्रेसने व्यापाऱ्यांच्या बाजूने उतरत राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढविला आहे.

याबाबत काँग्रेसने म्हटले आहे की, नगर शहरामध्ये व्यापारी आर्थिक दृष्ट्या देशोधडीला लागले आहेत. अनेकांच्या दिलेल्या मालाच्या ऑर्डर्स या रस्त्यात आहेत. ट्रकच्या ट्रक भरून येत आहेत. हा आलेला माल दुकान उघडण्याची परवानगी नसेल तर हा माल गाडीतच सडेल.

या नुकसानाला जबाबदार कोण ? अनेकांनी बँकांची कर्ज घेतलेले आहेत. त्यांचे हप्ते यामुळे थकत आहेत. इतर तालुक्यांमध्ये आणि अन्य ठिकाणी बाजारपेठ सुरू आहे.

मर्यादित वेळेत का होईना निर्बंधा सह व्यापाऱ्यांना तातडीने नगर शहरामध्ये बाजारपेठ खुली करून परवानगी देण्याची गरज आहे. अन्यथा नगर शहरातील बाजारपेठ आणि व्यापारी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडू शकतात.

अहमदनगर लाईव्ह 24