राजकीय वर्तुळात वादळ : आमदार लहामटेंनी माफी मागावी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- पंचायत समिती सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर यांनी जाणीवपूर्वक धुडगूस घातला.

आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासमोर त्यांचा कार्यकर्ता महसूल मंत्र्यांबरोबर सभागृहात अशोभनीय कृत्य करतो, तरीदेखील आमदार काहीच हरकत घेत नसतील, तर त्याचा बोलविता धनी हे दस्तुरखुद्द लहामटे हेच आहेत,

असा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

आमदार लहामटे यांना यापुढील काळात जर काँग्रेस पक्षासोबत राहून काम करावे असे वाटत असेल, तर राष्ट्रवादीच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करून पदाचा राजीनामा घ्यावा व या कृत्याबद्दल त्यांनी माफी मागावी.

अन्यथा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते कोणत्याच पातळीवर राष्ट्रवादीबरोबर काम करणार नाहीत, असा सज्जड इशाराही वाकचौरे यांनी यावेळी दिला.

१८ एप्रिलला महसूलमंत्री थोरात यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात आढावा बैठक घेऊन उपाययोजना सूचवल्या.

पंचायत समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार डॉ. सुधीर तांबे व डॉ. लहामटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वाकचौरे, मधुकर नवले, मिनानाथ पांडे, राष्ट्रवादीचे अशोक भांगरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे,

तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, तालुका कार्याध्यक्ष रवी मालुंजकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, नितीन नाईकवाडी आदी उपस्थित होते.

अकोल्यातील कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर व ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देण्यात संगमनेर तालुक्याच्या तुलनेत राजकीय बळाचा वापर करून अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप रवी मालुंजकर यांनी केला.

मंत्री थोरात हे आमचे आमदार डॉ. लहामटे यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतात, असेही ते म्हणाले. त्यामुळे गोंधळ निर्माण होऊन बैठकीचा नूरच बदलला.

अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन मालुंजकर यांना सभागृहातून बाहेर काढल्यावर बैठक पार पाडली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात वादळ उठले.

महाआघाडीच्या तत्वाला हरताळ फासल्याचा आरोप काँग्रेसने राष्ट्रवादीवर केला. माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनीही फेसबुक लाईव्ह करून मंत्री थोरात यांच्यावरच टीकाटिप्पणी केली.

बुधवारी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वाकचौरे, बाळासाहेब नाईकवाडी, मधुकर नवले, मिनानाथ पांडे, रमेश जगताप, मंदाबाई नवले, शिवाजी नेहे, अरिफभाई तांबोळी, विक्रम नवले, संपत कानवडे, चंद्रभान निरगुडे, शंकरराव वाळुंज,

रामदास धुमाळ, साईनाथ नवले, उबेद शेख आदींनी आमदारांवर तों़डसुख घेतले. आमदार लहामटे यांनीच मालुंजकर यांच्याकडून ही घटना घडवून आणल्याचा आरोप वाकचौरे यांनी केला.

मालुंजकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचा राजीनामा घेऊन माफी मागण्याचा सल्ला त्यांनी दिला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24