अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- घोटी इगतपुरी कार्यक्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचे पाणी दारणा गंगापूर धरण समूहात जमा झाले असून ते गोदावरी नदीला सोडले जात आहे, मात्र कोपरगाव परिसरात पर्जन्यमान अजूनही झालेले नाही, त्यामुळे येथील खरीप पिके पाण्यावर आलेली आहेत, तेव्हा पाटबंधारे खात्याने तात्काळ गोदावरी कालव्यांना शेती पाण्याचे आवर्तन सुरू करावे अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी नाशिक पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
शेतीला पाण्याची गरज असताना गोदावरी नदीला पाणी सोडले जात आहे यामुळे महाविकास आघाडीचे अजब तुझे सरकार असेच म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. श्री. साहेबराव रोहोम पुढे म्हणाले की, कोपरगाव हा परिसर अवर्षणग्रस्त आहे त्यासाठी ब्रिटिशांनी गोदावरी कालव्याची निर्मिती करून बारमाही सिंचन पाण्याची व्यवस्था केली.
मात्र गोदावरी कालव्यांची शेती पाण्याची अलीकडे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पाणी असूनही त्याचे नियोजन पाटबंधारे खात्याला व्यवस्थितरित्या करता आलेले नाही त्यामुळे येथील शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.
शेती व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन वेळेवर मिळत नाही. सध्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे, गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्यावरील हजारो हेक्टर खरीप पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत,
शेतकरी पाण्याची मागणी सातत्याने करत आहे मात्र महा विकास आघाडीचे भाजप सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे गोदावरी कालव्यांना पाणी सोडन्याऐवजी त्यांनी ते थेट नदीला सोडले आहे.
त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. तरी मायबाप सरकारने गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन तातडीने ओव्हर फ्लो चे पाणी गोदावरी कालव्यांना सोडावे अन्यथा याविरुद्ध नाईलाजास्तव रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल असेही साहेबराव रोहोम यांनी शेवटी म्हटले आहे.