मनपा निवडणूक स्वबळावरच, बूथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा – नाना पटोले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका महत्वाच्या असून स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केले आहे.

मुंबईच्या टिळक भवन येथील प्रदेश पक्ष कार्यालयात पक्षाचे जिल्हाध्यक्ष, विधानसभा व विधानपरिषदेचे आमदार, सर्व सेल व फ्रंटलचे प्रदेशाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगर शहरातील पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांच्यासमोर मांडला.

पटोले पुढे म्हणाले की, खा. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे पक्षाला लढणारे कार्यकर्ते हवे आहेत, पक्षासाठी काम करा, कसलीही तडजोड न करता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी उंचावेल यासाठी झोकून देऊन काम करा. महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या पसंतीला उतरले असून दिड वर्षाच्या कालावधीत झालेल्या विधान परिषद निवडणुकांसह ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झालेली आहे.

सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा, नव्या उत्साहाने व ताकदीने कामाला लागा. शहराचा आढावा देताना किरण काळे म्हणाले की, नगर शहरामध्ये महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीचे काम उत्तमपणे सुरु आहे.

मागील अकरा महिन्यांमध्ये पक्षाच्यावतीने जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर शहरात मोर्चे, आंदोलने,निदर्शने तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष आ. पटोले यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याचे शहर जिल्हा काँग्रेसने स्वागत केले असून पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आगामी अडीच वर्षानंतर होणार्‍या महानगरपालिकेच्या निवडणुकीची आत्तापासूनच आम्ही कंबर कसून तयारी सुरू केली असल्याचे यावेळी काळे यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे,

आ. शरद रणपिसे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आ. लहू कानडे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, किसान काँग्रेसचे शाम पांडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, वामसी रेड्डी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रमोद मोरे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24