कोरोनाच्या नियमांचे कडक पालन करावे – आमदार राधाकृष्ण विखे पाटील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-  कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासंदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाली असून रुग्णसंख्या रोखण्याच्या दृष्टीने सर्वांनाच सतर्क राहावे लागणार आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अंध व मूकबधीर केंद्रात सहकार चळवळीचे जनक पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व लोकनेते पदमभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या तैलचित्राचे अनावरण आमदार विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब घोरपडे यांचा सेवापूर्ती सोहळा साजरा होऊन विद्यालयातील अंध व मूकबधीर मुलांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले व स्व. मंजुळाबाई घोगरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अंध व मुकबधीर केंद्रास १० हजार रुपयांच्या मदतीच्या धनादेश आमदार विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

माजी सभापती तुकाराम बेंद्रे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बबलू म्हस्के, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर, उपसभापती बाळासाहेब जपे, विखे पाटील कारखान्याचे संचालक साहेबराव म्हस्के, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक ज्ञानदेव म्हस्के, मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक आंबादास ढोकचौळे, नवनाथ महाराज म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य अजित बेंद्रे, माजी संचालक आणासाहेब बेंद्रे, उपसरपंच अमृत मोकाशी, भारत घोगरे, भाऊसाहेब चेचरे, प्राचार्य दीपक डेंगळे याप्रसंगी उपस्थित होते.

आमदार विखे पाटील म्हणाले, तालुक्यातील गावांमध्ये भरणारा आठवडे बाजार बंद करण्याबाबत स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून परीस्थितीनुरूप निर्णय करण्याबाबच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे आ.विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

एक वर्षापूर्वी आलेल्या या संकटाचा सामना आपण सर्वानी केला. पुन्हा या संकटाची भीषणता समोर आली आहे. त्यामुळे आता प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. पहिल्या संकटाच्या वेळी दवाखाने बंद होते. उपचारांसाठी कोविड सेंटरशिवाय पर्याय नव्हता. आता दवाखाने सुरू आहेत, त्यामुळे छोटासा आजारही अंगावर काढू नका.

जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा फॅमिली डॉक्टरकडून उपचार घ्या. याबाबत आरोग्य विभागाला सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कोविड प्रतिबंधात्मक लसही उपलब्ध झाल्याने याबाबतही नागरीकांनी सतर्कता दाखण्याचे आ.विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24