अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाची वाढती व्याप्ती पाहता प्रशासनाने अनेक कठोर नियमांची अमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. यातच राज्य सरकारने देखील कोरोनाला अटकाव करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पाऊले उचलली आहे.
काही दिवसांपासून कोरोनाचे संर्सग वाढत आहे. बाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे संचारबंदीसह जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.
याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबदी लागू करण्याचा आदेश दिला असून, नगर शहरात संचारबंदीच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल.
पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने पथके वाढवून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी रविवारी दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गोरे
यांनीही शहरातील पथकांचा आढावा घेऊन आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. महापालिकेची चार भरारी पथके गेल्या १५ दिवसांपासून शहरात फिरत आहेत. यामध्ये मनपाचे प्रमुख अधिकारी व पोलिसांचाही समावेश आहे.
हे पथक शहरातील गर्दीच्या ठिकाणी जाऊन कारवाई करत आहेत. यापूर्वी दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल, यासाठी रात्री ९ वाजेपर्यंत मुदत होती. ती कमी करून सायंकाळी ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.