अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- नगर शहरात कोविड रूग्णांची संख्या कमी असल्याने बाजाराची वेळ वाढवून द्यावी आणि शनिवार, रविवारचा लॉकडाऊन मागे घ्यावा, अशी मागणी जोर धरत होती.
मात्र संसर्ग वाढीच्या वेगाचा दाखला देवून आता प्रशासन अधिक कडक भुमिका घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले तर उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवले आहे. नगर शहरात करोना रूग्णांची संख्या कमी असल्याकडे व्यापारी संघटना लक्ष वेधत आहेत.
गेल्या दीड वर्षापासून बाजारात निर्बंध असल्याने व्यापार कोसळला आहे. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. बाजारावर हे निर्बंध वाढत राहिल्यास आर्थिक अडचणींत भर पडणार आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात यावे तसेच वेळ मर्यादा वाढून द्यावी अशी मागणी व्यापारी करू लागले होते.
मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आलेल्या 11 जिल्ह्यात नगरचा समावेश असल्याने निर्बंध कायम आहेत. जिल्ह्याधिकार्यांनी सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्याने जिल्ह्याच्या काही तालुक्यात करोना रुग्ण संख्या पुन्हा गतीने वाढताना दिसत असल्याचे म्हटले आहे.
हा दर वाढत राहिल्यास जिल्ह्यात पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करावे लागतील. काही ठिकाणी परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त आस्थापना सुरु असल्याचे दिसत आहे. अशा आस्थापना बंदची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.
महानगरपालिका क्षेत्रातही सायंकाळीही आस्थापना सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक कारवाई गतिमान करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.