अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने प्रथमच ६० हजार अंकाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. या तेजीतून जोरदार कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आज बाजारात अक्षरश: दिवाळी साजरी केली.

आज शुक्रवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्सने ३६६ अंकाची झेप घेत ६०२५१ अंकाची विक्रमी पातळी गाठली. निफ्टी देखील १०९ अंकांच्या वाढीसह १७९३१ अंकापर्यंत पोहोचला आहे.

आधी जानेवारी महिन्यात सेन्सेक्सने ५० हजारांचा टप्पा ओलांडला होता. निफ्टीदेखील नवे विक्रम करत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. कोणत्याही क्षणी निफ्टी १८ हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

निफ्टी मिड कॅप, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसमध्ये वाढ झाली आहे. निफ्टीच्या ५० पैकी ३८ शेअर्समध्ये नफा दिसून येत आहे.

त्याचबरोबर १२ समभागांमध्ये घसरण आहे गेल्या काही महिन्यांत भारतीय शेअर बाजारात सतत वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. गेल्या काही महिन्यांत भारतीय बाजारात विदेशी भांडवलाची आवक अपेक्षेपेक्षा जास्त झाली आहे.

या व्यतिरिक्त, देशाच्या अर्थव्यवस्थेला लसीकरणाचा लाभ मिळत आहे आणि करोनाच्या प्रकरणामधील घट तसेच अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची कारणे आहेत.