सुरत चेन्नई एक्स्प्रेस ग्रीन फिल्डच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सुरत चेन्नई एक्स्प्रेस ग्रीन फिल्डच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध होत आहे. शुक्रवारी (दि. १४) राहुरी खुर्द येथे भूसंपादनाच्या मोजणीसाठी महसूल अधिकारी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना तीव्र विरोध केला.

शेतकरी आक्रमक झाल्याने अधिकाऱ्यांना माघारी जावे लागले. शहरी व ग्रामीण हद्दीतील जमिनीचा मोबदला लेखी स्वरुपात द्यावा. अन्यथा जीव गेला तरी बेहत्तर परंतु आम्ही कुठल्याही प्रकारची मोजणी होऊ देणार नाही.

शासनाने शेतकऱ्यांवर दडपशाही करून जमिनी हडप करण्याचा प्रयत्न बंद करावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. याबाबत नायब तहसीलदार संध्या दळवी यांना शेतकऱ्यांनी निवेदन देत मोजणीस विरोध दर्शविला.

सुरत-नाशिक- अहमदनगर ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. राहुरी खुर्द गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पोल फॅक्टरी, सबस्टेशन, मुळा धरण या वेगवेगळ्या प्रकल्पात अल्प मोबदला देऊन शासनाने भूसंपादन करून घेतल्या.

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. यापूर्वी झालेल्या भूसंपादनामुळे आमचे कुटुंब अत्यंत हालअपेष्टा सहन करीत आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे जमिनी संपादनाबाबत वरिष्ठ स्तरावर प्रकल्प बाधितांनी त्यांच्या अडचणी मांडल्या आहेत.

याबाबत महाराष्ट्र शासनाच्या निर्णयासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहेत. मात्र त्याबाबत अद्यापही प्रकल्पग्रस्तांना काहीही माहिती मिळालेली नाही. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय जमिनी संपादन केल्या जाऊ नयेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

यावेळी झालेल्या चर्चेत सूर्यकांत भुजाडी, बाबासाहेब धोंडे, अशोक तोडमल, अनिल वराळे, जमीर आतार, किशोर वराळे, उत्तम वराळे, गंगाधर सांगळे, भारत शेंडगे, तुषार काळे, दिगंबर शेंडगे आदी शेतकरी उपस्थित होते.