अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या श्रीगोंदा आगारातील डिझेल पंपाचे तीन दिवसांपासून डिझेल संपले आहे. त्यामुळे आगाराच्या ५३ पैकी ४३ बसेस डिझेलअभावी आगारातच उभ्या असून, दहाच बसेस सुरू आहेत.
त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. यामुळे आगाराचे दिवसाकाठी मोठे आर्थिक नुकसान होत आहे. परिवहन महामंडळाला कोरोना महामारीचा फटका बसला असून, प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. अशा परिस्थितीत इंधन दरवाढ गगनाला भिडली आहे.
परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेची चाके उलटी फिरू लागली. डिझेलअभावी एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. पैशाअभावी श्रीगोंदा आगाराला डिझेल मिळत नाही. परिणामी आगारातील डिझेल पंप बंद पडला आहे. बसेसमध्ये डिझेल नाही.
त्यामुळे आगार व्यवस्थापकांनी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ५३ पैकी ४३ बस बंद आहेत. आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच नगर, शिरूर, दौंड, कर्जत या मार्गावरील २० टक्केच बसेस चालू आहेत.
त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. डिझेलअभावी बससेवा बंद पडण्याची ही पहिलीच वेळ असून, प्रवाशांबरोबरच वाहक-चालकही हवालदिल झाले आहेत.
कोरोना महामारीमुळे प्रवाशांचे प्रमाण कमी झाले. डिझेलची दरवाढ झाली त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. डिझेल खरेदीसाठी पैसे उपलब्ध होत नाहीत. येत्या दोन दिवसात बससेवा सुरळीत सुरू होईल. अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.