Success Story: वडिलांसोबत ऊस तोडणीचे काम करत केला अभ्यास! आता कष्टाने झाली फौजदार, वाचा या कन्येची यशोगाथा

Published by
Ahmednagarlive24 Office

Success Story:- बऱ्याचदा आपल्याला समाजात असे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी दिसून येतात की त्यांच्यामध्ये अलौकिक अशी बुद्धिमत्ता असते. परंतु घरची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची असल्यामुळे त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शैक्षणिक दृष्ट्या नुकसान तर होतेच परंतु त्याचा विपरीत परिणाम हा संपूर्ण आयुष्यावर दिसून येतो.

परंतु याला काही विद्यार्थी विद्यार्थिनी अपवाद असल्याचे आपल्याला दिसून येतात. मनामध्ये असलेली जिद्द, ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारे सर्व कष्ट आणि सातत्य इत्यादी महत्त्वाचे गुण अशा विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये असतात. असे विद्यार्थी विद्यार्थिनी कितीही परिस्थिती हलाखीची राहिली किंवा इतर परिस्थिती प्रतिकूल राहिली तरी त्यावर मोठा प्रयत्न आणि कष्टाने मात करतात व अनन्यसाधारण असे यश मिळवतात. याच मुद्द्याला धरून जर शिरूर तालुक्यातील खोकरमोहा या गावच्या रहिवाशी असलेल्या राधा इनकर यांची यशोगाथा पाहिली तर ती काहीशी या मुद्द्याला साजेशी आहे.

ऊसतोड कामगाराच्या मुलीची फौजदार पदाला गवसणी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरूर तालुक्यात असलेल्या खोकरमोहा या गावात आप्पासाहेब इनकर व त्यांचे कुटुंब राहते. आप्पासाहेबांच्या कुटुंबामध्ये चार मुली व एक मुलगा असा परिवार असून त्यांची घरची परिस्थिती मात्र खूप हलाखीची होती. मुलाबाळांचा उदरनिर्वाह करता यावा याकरिता त्यांच्याकडे ऊस तोडीणीच्या कामाला जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता.

परंतु अशा बिकट परिस्थितीमध्ये त्यांना मुलींना शिकवायचे होते व त्याकरिता त्यांनी हवे ते सगळे प्रयत्न केले व कष्ट उपसले. या कष्टाचे फळ त्यांना त्यांची मोठी मुलगी राणी यांची जेव्हा वनरक्षक म्हणून निवड झाली त्यानिमित्ताने मिळाले. तसे पाहायला गेले तर त्यांच्या थोरल्या मुलीला म्हणजेच राणीला देखील अधिकारी व्हायचे होते.

परंतु परिस्थितीमुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले. पण आपल्या लहान बहिणीला अधिकारी बनवायचे हे मोठ्या बहिणीने मनाशी ठरवले व राधा यांना त्यांच्या थोरल्या बहीण राणी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले व सगळ्या गोष्टींची मदत केली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राधा या जेव्हा सातवी, नववी आणि अकरावी मध्ये होत्या तेव्हा त्यांच्या आई आजारी पडल्या.

या कालावधीमध्ये वडिलांना मदत म्हणून त्यांनी सातारा जिल्ह्यात जाऊन वडिलांसोबत ऊस तोडणीचे काम देखील केले. या ऊसतोड कालावधीमध्ये तीन वेळा त्यांना शाळेतून नाव देखील काढावे लागले. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत पुढे शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षांची तयारी केली.

त्यानंतर 2021 मध्ये देण्यात आलेल्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या व आता त्यांची फौजदारपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे राधा या शिरूर तालुक्यातील तिसरी पोलीस अधिकारी म्हणून नावारूपाला आले आहेत. राधा यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी याकरिता बार्टी या संस्थेने सर्व पुस्तके पुरवली. तसेच मध्यंतरीच्या कालावधीमध्ये त्यांच्या वडिलांनी राधा यांच्या शिक्षणाकरिता कर्ज काढले. तसेच फौजदार साठी आवश्यक मैदानी चाचणीसाठी लागणारे आवश्यक शूज देखील त्यांनी घेऊन दिले. या सगळ्या प्रयत्नातून मनाची तयारी व घरचे पाठबळ, तसेच ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द असल्यामुळे त्यांनी फौजदार पदाला गवसणी घातली.

Ahmednagarlive24 Office