अहमदनगर जिल्ह्यात ऊस प्रश्न पेटेल असे चित्र दिसत आहे. सध्या जिल्ह्यात ऊसतोडणी झाल्या, कारखान्याचे गळीत हंगाम देखील सुरु झालेत. परंतु अद्यापही अनेक कारखान्यांनी ‘एफआरपी’ नुसार दर जाहीर केलेले नाहीत. उसाला एक जिल्हा-एक भाव या धोरणानुसार ३५०० रुपये भाव द्यावा यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांत साखर कारखान्यांनी दर जाहीर केले नाही, तर कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करा असा आदेशच आता जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रादेशिक साखरसह संचालक डॉ. प्रवीण लोखंडे यांना दिलाय. त्यामुळे आता कारखानदारांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
शेतकरी संघटना आक्रमक
कारखान्यांनी अद्याप अंतिम भाव जाहीर केला नाही. त्यामुळे हा भाव ३५०० रुपये प्रमाणे द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार साखर कारखान्यांनी दोन दिवसात अंतिम भाव जाहीर केला नाही तर कारखान्यांवर गेट बंद आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. आता आम्ही आक्रमक आंदोलन करू असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेत दिले आदेश
ऊस दर व ऊस वाहतूक दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रादेशिक सहसंचालक डॉ. प्रवीण लोखंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, प्रहार जनशक्ती, स्वाभीमानी शेतकरी पक्ष, भाजप किसान मोर्चा, रयत क्रांती संघटना, कारखान्यांचे अध्यक्ष आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील २१ पैकी १२ साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता जाहीर केला.
मात्र, अंतिम दर जाहीर केलेला नाही. शेतकरी संघटना प्रतिनिधींनी ३५०० रुपये दर जाहीर करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दोन दिवसांत अंतिम दर जाहीर झाले नाही, तर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी, असे आदेश दिले.