अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- शेतीच्या कारणावरून नेहमी त्रास देतो म्हणून तिघांनी एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नवनागापूरात घडली. या हल्ल्यात सुरज कचरू कातोरे (वय 25 रा. तलाठी कार्यालयामागे, नवनागापूर) हा तरूण जखमी झाला आहे.
त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारे दीपक भारती व दोन अनोळखी इसम (नाव पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सुरज कातारे हे त्यांच्या घराच्या बाहेर दुचाकीवर बसून मोबाईल पाहत असताना तेथे दीपक भारती व त्याचे दोन अनोळखी साथीदार आले.
दीपक याने सुरज यांना धक्का देऊन खाली पाडले व म्हणाला की, मी तुला आज जिवंत ठेवणार नाही. तु मला शेतीच्या कारणावरून नेहमी त्रास देतो. तुझे आता लई झाले, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.
दीपक सोबत आलेल्या अन्य दोघांनी सुरज यांना शिवीगाळ, मारहाण करून त्यांच्या अंगावर बसले. त्यावेळी दीपक याने दगड उचलून सुरज यांच्या डोक्यात घातला.
सुरज यांना डोक्याला मार लागला आहे. सुरज यांनी आरडाओरडा केल्यानंतर दीपक व त्याचे दोन साथीदार घटनास्थळावरून पसार झाले.