अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-डॉ. तनपुरे कारखान्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. याच प्रश्नावर सुजय विखे यांनी आपले मत मांडले. कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता आम्ही तीन हंगाम पार केले आहेत.
कोणीही कर्ज न घेता एक हंगाम चालू करून दाखवा, मी खासदारकीचा राजीनामा देईल. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. कामगार व सभासदांवर आम्ही नेहमी प्रेम केले आहे. त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मात्र, कामगारांचे सध्या आंदोलन सुरू आहे.
त्यास काहीजण पाठिंबा देत आहेत. ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांना संचालक करून कारखाना चालत असेल तर आमची आजही राजीनामा देण्याची तयारी आहे.
डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचा व शेतकर्यांचा मेळावा राहुरी येथील येथे माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे मार्गदर्शक तज्ज्ञ संचालक खा. डॉ. सुजय विखे, चेअरमन नामदेवराव ढोकणे, माजी चेअरमन व विद्यमान संचालक उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढुस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी विखे बोलत होते. पुढे बोलताना विखे म्हणाले, डॉ. तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देता येत नाही. मग राहुरीच्या मार्केट कमिटीला सहा-सहा महिने अशी एक वर्ष मुदतवाढ कोणत्या कायद्याने राज्य शासनाने दिली? त्याच कायद्याने डॉ. तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाला देखील मुदतवाढ दिली जावी.
म्हणजे कारखाना सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. विखे म्हणाले, हा कारखाना सुरू करण्यासाठी माझ्याबरोबरच माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत केली. म्हणून हा कारखाना सुरू होऊ शकला, अन्यथा ते शक्य नव्हते. सन 2019 मध्ये दुष्काळामुळे कारखाना बंद ठेवावा लागला.
यावर्षी जर सहा लाख टन ऊस गाळप केला तर सर्वांची देणी आम्ही देऊ शकतो. कारखाना सुरू करण्यासाठी अनेकवेळा आम्ही स्वतः गुंतवणूक केली. राहुरी तालुक्याने मला भरभरून दिले आहे. आम्ही उपकार विसरणार नाही. आम्हाला कोणी अडचणीत आणत असेल तर आम्ही साधे राजकारणी नाहीत, हे कोणी विसरू नये.
ज्यांचे एक टिपूस देखील कारखान्याला आले नाही, ते आमच्यावर आरोप करीत आहेत. आम्ही हा कारखाना चालविण्यास कटिबद्ध आहोत. मात्र, सर्वांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे.