अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- बहुचर्चित रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर अटक करण्यात आली असल्याची चर्चा सध्या अहमदनगर जिल्ह्यात सुरु आहे. मात्र याबाबतची अद्याप तरी अहमदनगर पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे हा पोलिसांना शरण आल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यात चालू आहे. मात्र बोठे हा शरण देखील नाही आणि त्याला अटकही झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर फरार असलेला पत्रकार बाळ बोठे हा पोलिसांच्या ताब्यात असल्याची चर्चा सवर्त्र सुरु होती , याबाबत अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी खुलासा केला असून ही बातमी अफवा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मागील वर्षी 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून पत्रकार बाळ बोठे याचे नाव आले. मात्र तेव्हापासून बोठे हा फरार आहे. गेल्या तीन महिन्यापासून बोठे याचा शोध लागला नाही. रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला फरार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला आहे.
त्याला पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर संपत्ती जप्तीची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे.